सोलापूर,दि.30: 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शासनाने 31 डिसेंबर रोजी वाईन शॉप, बीअर शॉपी व देशी दारू दुकाने मध्यरात्री एकपर्यंत व परमिट रूम पहाटेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.
सोलापूर शहर व जिल्ह्यात मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत दरवर्षी जल्लोषाने केले जाते. यासाठी ठिकठिकाणी मित्र-मैत्रिणी पार्ट्यांचे आयोजन करतात. त्यामुळे शासनाने 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री एकपर्यंत मद्य विक्री दुकानांना तर पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम चालू ठेवण्याला परवानगी दिली आहे.
हेही वाचा काँग्रेसचा महाविकास आघाडीचा जागावाटपावर फॉर्म्युला ठरला?
सोलापूर शहरात देशी दारू दुकाने 20, वाईन शॉप 22, परमिट रूम 95 व बीअर शॉपी 67 आहेत. तर जिल्ह्यातील देशी दारू दुकाने 115, वाईन शॉप 42, परमिट रूम 585 व बीअर शॉपी 250 आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकदिवसीय क्लब पार्ट्यांकरिता तसेच वार्षिक व आजीवन मद्य सेवन परवाना मंजूर केला जातो.
याकरिता इच्छुक अर्जदारांना आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाईट https://exciseservices.mahaonline.gov.inhttps://exciseservices.mahaonline.gov.in वर जाऊन संबंधित परवान्याकरिता ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. नवीन परवानाकरिता लागणार्या आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर दिलेली आहे. मागील वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात 84.77 लाख लीटर देशी दारू, 83.55 लाख लीटर विदेशी दारु, 64.80 लाख लीटर बीअर व 1.14 लाख लीटर वाईनची विक्री झाली आहे.
सहा पथकांची नेमणूक
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात एकूण सहा पथके नेमण्यात आली असून सोलापूर शहराकरिता दोन पथके, पंढरपूर, माळशिरस विभागात एक-एक पथक, याव्यतिरिक्त परराज्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी सीमा तपासणी नाक्याचे पथक व एक जिल्हा भरारी पथक नेमण्यात आले आहे. या पथकात एक निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक, एक सहायक दुय्यम निरीक्षक, तीन जवान व वाहन चालक असा स्टाफ समाविष्ट आहे. ही पथके रात्रंदिवस गस्त घालत असून परराज्यातील दारू रोखण्यासाठी वाहनांची तपासणी सुरू आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी धाबे, हॉटेल येथे अवैध दारूची विक्री होणार नाही तसेच त्या ठिकाणी बसून पिण्याची व्यवस्था करणार्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मागील वर्षी 31 डिसेंबरच्या पार्टीकरिता एकूण सात वनडे क्लब परवान्याकरिता अर्ज प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे यावर्षीही ज्या हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी नववर्षानिमित्त पार्टी आयोजित करावयाची असल्यास त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वन डे क्लब परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना दारुची विक्री किंवा पार्टी आयोजित केल्यास संबंधित मालक व आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला जाईल, असा इशारा अधीक्षक धार्मिक यांनी दिला आहे.