मुंबई,दि.२६: निहार ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणूक आयोगाने तात्पुरते धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गट अथवा शिंदे गटाच्या वकिलांनी अद्याप याची पुष्टी केली नाही. हे वृत्त समोर आल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला मिळेलं, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना निहार ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सादर करण्यात आलेली अडीच ते तीन लाख प्रतिज्ञापत्रे रद्द केली आहेत. संबंधित प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगानं ठरवलेल्या फॉरमॅटनुसार नव्हती, असं कारण आयोगानं दिल्याचं समजत आहे. या कारणामुळेच ते प्रतिज्ञापत्रं रद्द केली आहेत. याचा ठाकरे गटाला कुठे ना कुठे फटका बसू शकतो.
असं असलं तरी, शेवटी बहुमत कुणाकडे आहे? हे दोन्ही गटांना सिद्ध करावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजुने बहुसंख्य खासदार आणि आमदार आहेत, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, वेळ आल्यावर आम्ही नक्की बहुमत सिद्ध करू… कारण बहुमत आमच्याच बाजुने आहे. निवडणूक आयोगही आमच्याच बाजुने निर्णय देईल, अशी मला अपेक्षा आहे. तसेच शिवसेनेचं मूळ चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थातच शिंदे गटाला मिळेल, अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली आहे.