पुणे,दि.11: अनेकांना मांजर पाळण्याची आवड असते. अनेकांच्या घरात मांजर पाहायला मिळते. मात्र, मांजर पाळण्याची हौस असणाऱ्या पुणेकरांसाठी आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात आता यापुढे मांजर पाळायची असेल तर महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. याआधी श्वान अर्थात कुत्रा पाळायचा असेल तर महापालिकेचा परवाना घ्यावा लागत होता. मात्र मांजर पाळण्यासाठी असे कुठलेही नियम नव्हते.
कुत्र्यासोबत आता मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने महापालिकेने मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याचा नियम केला आहे. त्यासाठी अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत.
यासोबतच ही नोंदणी दरवर्षी नव्याने करावी लागेल. नूतनीकरण करताना 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क घेतले जाणार आहेत. याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महापालिकेने कुत्र्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तसंच मांजराची नोंदणीही ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आठवडाभरात ती सुरू होईल, असं सांगितलं जात आहे.
कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणं आवश्यक आहे. मात्र, अद्यापही नागरिकांनी महापालिकेच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात 1 लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत. मात्र, आत्तापर्यंत फक्त 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे. आता मांजर पाळण्याचं प्रमाणही वाढत आहे. अशातच महापालिकेनं मांजरासाठीही परवाना घ्यावा लागणार असल्याचं सांगितलं आहे.