सोलापूर,दि.३० : आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. मोबाइलवर बँक खात्याचा बॅलन्स तपासण्यास लावून भामट्याने ५६ हजार रुपयांची रोकड काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सोहम विष्णुदास शिंदे (वय ३५, रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल ८९६७७०२३२२ धारकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने फिर्यादीस फोन करून तो कुर्ला येथील एका बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीस मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीच्या बँक खात्याचे नेट बँकिंग सुरू करून मुख्य बॅलन्स तपासण्यास सांगून बँक खात्यातून सहा हजार ६०० रुपये व क्रेडिट कार्डमधून ४९ हजार १९७ रुपये असे एकूण ५५ हजार ७९७ रुपयांची फसवणूक केली आहे.