मुंबई,दि.8: शरद पवारांबाबत गैरसमज पसरवला जात असून राष्ट्रवादी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील शहरांच्या नामांतरावर सत्ताधारी आणि विरोधकांमधून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं होतं. तर शिंदे-फडणवीस सरकार येताच नावात बदल करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव केलं गेलं. या नामांतराच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना शरद पवारांच्या दौऱ्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली होती. या दौऱ्यावेळी शरद पवार यांनी मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं वक्तव्य केल्याचं वृत्त प्रसारीत झालं होतं. दरम्यान, आता हे वृत्त फेटाळून लावण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर खुलासा करण्यात आलाय.
शरद पवारांबाबत गैरसमज
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हडपसरमध्ये बोलताना म्हटलं की, “शरद पवार यांनी औरंगाबाद म्हणणार असे विधान कुठे ही केलं नाही. हे सगळं फेक नरेटिव्ह केलं जातं आहे.” अमोल कोल्हे यांच्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही यावर स्पष्टीकरण दिलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपासून मी शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी कोणत्याच कार्यक्रमात शहराच्या नामांतरावर मत मांडलेलं नाही. एका वृत्तवाहिनीकडून खोडसाळपणा करण्यात आला. याविरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहितीही सूरज चव्हाण यांनी दिली.
शरद पवार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी एक किस्सा सांगितला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, जाफराबादवरून येताना एका सहकाऱ्याने समृद्धी महामार्ग बघण्याची इच्छा व्यक्त केली. त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो. शरद पवार यांनी शहराचा उल्लेख औरंगाबाद केल्याचं लक्षात येताच दुरुस्ती करत संभाजीनगर असं म्हटलं आणि वाद वाढवायचा नसल्याचे सांगितले.