Home देश मोदी-शाहांची भेट अन् पटेलांची धाव, शरद पवारांचा नक्की गेम प्लॅन काय?

मोदी-शाहांची भेट अन् पटेलांची धाव, शरद पवारांचा नक्की गेम प्लॅन काय?

0

सोलापूर,दि.२८: गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत घडलेल्या काही वेगाने हालचालींमुळे या चर्चांना नवे उधाण आले असून, अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

संसदेतील भेटीनंतर घडामोडींना वेग

दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच, बुधवारी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसदेमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रफुल पटेल यांनी शरद पवारांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लोकसभा पुनर्रचना आणि एनडीएतील संभाव्य प्रवेश

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्ष रालोआमध्ये (NDA) सहभागी होणार का, याविषयी विविध अटकळी बांधल्या जात आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शरद पवारांच्या पक्षाला एनडीएमध्ये येण्यासाठी ‘अजित पवारांच्या पक्षात विलीन व्हा’ अशी अट घातल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांचा या विलीनीकरणाला विरोध असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांच्या या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुनील तटकरेंची अमित शाहांची भेट

या घडामोडी घडत असतानाच, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीबाबत तटकरेंनी मौन बाळगले असले तरी, दिल्लीतील या सलग बैठकांमुळे विलीनीकरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चिन्हं आहेत.

पवार कुटुंबाचे स्नेहमिलन की नव्या समीकरणांची नांदी?

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील ‘६ जनपथ’ या शरद पवारांच्या निवासस्थानी भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या सोहळ्याचे आमंत्रण दिले. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि देशातील प्रमुख राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार असून, या सोहळ्यातून भविष्यातील राजकारणाची नवी समीकरणे तयार होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.