सोलापूर,दि.14 : सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर असा प्रकार आहे. ज्यांना सकाळी स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही त्यांनी फक्त 13 बीजमंत्रासहित व श्वास प्रश्वासयासह नियमित सूर्यनमस्कार केले तर त्यामध्ये आसन, प्राणायाम, मंत्रशास्त्र व ध्यान या गोष्टी साध्य होतात. तेही फक्त वीस मिनिटात. शरीराची लवचिकता, मनाचा कणखरपणा, आत्मविश्वास वाढीस लागतो. दहा किंवा बारा आसनाची साखळी असलेला सूर्यनमस्कार सर्वांसाठी महत्त्वाचा योगाभ्यास आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात त्याचा कायमस्वरूपी अवलंब करावा असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र जुळे सोलापूरचे संचालक नंदकुमार चितापुरे यांनी आज येथे केले.
भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर व विवेकानंद केंद्र जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लहान बालकांसाठी योग व व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
योग एक जीवन पद्धती: नंदकुमार चितापुरे
चितापुरे म्हणाले की योग एक जीवन पद्धती आहे. आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी योगाची नितांत आवश्यकता आहे. योग ही सार्थक आणि आनंदी जीवन जगण्याची कला आहे. ‘योगशास्त्रातील ज्ञान हे लहान मुलांनाही समजले पाहिजे अशा रीतीने त्याची मांडणी करणे हा माझ्या जीवनाचा हेतू आहे’ असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते.
विवेकानंद केंद्र नगर सोलापूर व नगर जुळे सोलापूर येथे सर्व महिला व पुरुष यांच्यासाठी रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत मोफत योगवर्ग सातत्याने चालू असतात. सध्या सोलापूर नगराचे आयोजन रवि कंटली यांच्या मार्गर्शनाखाली 165 रेल्वे लाईन, बालाजी मंदिर हाॕल पश्चिम मंगळवार पेठ, यंत्रमाग धारक संघ एम आय डी सी., होटगी महाराज मठ, शेळगी येथे असून जुळे सोलापूर परिसरात दिपालीताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही के वयम् , बाॕम्बेपार्क जवळ, इंडस्ट्रियल इस्टेट सभागृह, होटगी रोड, चैतन्य नगर , संत सेवा वाचनालय, विजयापूर रोड आणि हत्तुरे वस्ती विमानतळाजवळ येथे संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत महिलांसाठी नियमित योगवर्ग चालू आहेत. अशी माहिती चितापुरे यांनी यावेळी दिली.
लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी त्यांना योग, संस्कृती आणि सभ्यता याविषयी माहिती पोहोचवण्याचा विवेकानंद केंद्रचे व्यक्तिमत्व शिबिर अत्यंत कौतुकास्पद आहे. 21 जूनला होणाऱ्या 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला आपण विद्यार्थी व आपले पालक या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव यांनी केले.
योगशिक्षक ओंकार औरसंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे 21 सूर्यनमस्काराचे सराव करून घेतले. यावेळी उत्कृष्ट सूर्यनमस्कार केलेल्या दहा विद्यार्थ्याना ‘सरदार पटेल सचित्र जीवनगाथा’ हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वरूपात देण्यात आले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- कुमारी नेहा हबीब, वैष्णवी बेले, श्रुती सगरी, शौर्य नवले, शतराज सुरवसे, धोंडीराज जाधव, वेदांत शिरसागर, वेदा पाठक, संस्कृती गवंडी आणि अंशुल मिरजकर.