Raj Thackeray On Karnataka Election Result: आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव: राज ठाकरे

0

अंबरनाथ,दि.१४: Raj Thackeray On Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालावर (Karnataka Election Result) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून सत्ताधारी भाजपला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपचे अनेक मंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. तरीही जनतेनं काँग्रेसला एकहाती सत्ता दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातील विजय हे काँग्रेसचं यश असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे हे आज अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विरोधी पक्ष कधी जिंकत नाही, सत्ताधारी हरत असतात | Raj Thackeray On Karnataka Election Result

‘मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा,’ असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

तुमच्याकडून चूक झाली ती झाली…

पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला दणका होता. ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी हा शपथविधी करण्यात आला होता, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच म्हटलं होतं. त्याबाबत विचारले असता, तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं हे राजकारण झालं. उगाच सारवासारव करू नका, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना फटकारलं आहे.

महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही

कर्नाटकाच्या निकाल हे महाराष्ट्रातही बदलाचे संकेत आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. लगेच काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींवर स्तुतीसुमने

‘कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक केलं आहे. दरम्यान, पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय?’ असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here