मुंबई,दि.१५: Nana Patole-Sharad Pawar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “शरद पवारांच्या भेटी आमच्यासाठी चिंतेचा विषय” असे म्हटले आहे. नाना पटोले यांनी सूचक विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सरकारमध्ये सामील झालेल्या गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या भेटीची जोरदार चर्चा चालू आहे. पुण्यात या दोघांची चोरडिया नावाच्या उद्योगपतीच्या घरी भेट झाली. या भेटीवरून तर्क-वितर्कांना उधाण आलं असून यामुळे मविआमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस व ठाकरे गटाकडूनही यासंदर्भात वेळोवेळी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता काँग्रेसकडून शरद पवारांशिवाय मविआच्या प्लॅन बीवर विचार चालू असल्याचं सांगितलं जात आहे. नाना पटोलेंनी यासंदर्भात विचारणा केली असता थेट ‘हाय कमांड’कडे बोट दाखवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार आणि शरद पवार यांची भेट
काही दिवसांपूर्वी शरद पवार व अजित पवार यांची पुण्यात एका व्यावसायिकाच्या घरी भेट झाली. यानंतर अजित पवारांनी शरद पवारांना सरकारमध्ये सामील होण्यासाठी विनंती केल्याचंही सांगितलं गेलं. मात्र, बैठकीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. पण यासंदर्भात काँग्रेस व ठाकरे गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. खुद्द शरद पवारांनी भाजपाबरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असतानाही तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
नाना पटोले काय म्हणाले? | Nana Patole-Sharad Pawar
आज सकाळी मुंबईतील टिळक भवनात ध्वजारोहणानंतर माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली. शरद पवार व अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे का? अशी विचारणा केली असता नाना पटोलेंनी त्यावर हाय कमांड अर्थात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेसमधील इतर वरीष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगितलं आहे.
शरद पवारांच्या भेटी आमच्यासाठी चिंतेचा विषय
“आमचं हाय कमांड आता यावर निर्णय घेईल. यावर आम्ही कोणता निर्णय घेण्याचं काही कारण नाही”, असं ते म्हणाले. “शरद पवारांच्या भेटी आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच. अशा लपून होणाऱ्या भेटीगाठी बरोबर नाहीत. पण ही सगळी चर्चा उच्च पातळीवर होईल. इंडिया आघाडीच्या पातळीवर होईल. मी यावर काही बोलणं योग्य नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट
“कुठल्या पक्षात काय चाललंय हा आमचा विषय नाहीये. त्या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार काय भूमिका घेतात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर कुणी जबरदस्ती करण्याचं काही कारण नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जो कुणी भाजपाविरोधात लढायला तयार असेल, त्याला आम्ही सोबत घेऊन चालू ही आमची भूमिका आहे”, असं नाना पटोलेंनी यावेळी बोलताना नमूद केलं.
“इंडियाच्या बैठकीत मी नाही. आमचं हायकमांड त्यात आहे. देशभरातील २६ प्रमुख नेते आहेत. ७ मुख्यमंत्री त्यात आहेत. त्या पातळीवर ही चर्चा होत आहे. त्यामुळे इथे आम्ही चर्चा करणंच योग्य नाही”, असं ते म्हणाले.