मुंबई,दि.15: Nana Patole On Narendra Modi: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले आहे. मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला (Pulwama attack) हा केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी चूक होती, असा दावाही मलिक यांनी केला. या हल्ल्यात तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. हे नेमकं कसं घडलं? या हल्ल्यामागे नेमकं कोण होतं? या प्रश्नांची अद्याप उत्तरं सापडलेली नसताना भाजपाच्याच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. (Nana Patole On Satya Pal Malik Statement)
भाजपचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व 300 कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये 40 जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या आरोपात अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हे आरोप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत… | Nana Patole On Narendra Modi
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. पुलवामा घटनेत सरकारची अक्षम्य चूक झाली या मलिक यांच्या आरोपावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले? जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेत वापरलेले गेलेले 300 किलो आरडीएक्स कुठून आले? याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मलिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न मोदी सरकारकडे बोट करत आहेत. हे आरोप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. पुलवामा घटना व 40 जवानांचे बलिदान भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी लागतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
300 कोटींची ऑफर दिल्याच्या आरोपावर भाजप गप्प का? | Nana Patole On Satya Pal Malik Statement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी 300 कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती हा आरोपही अत्यंत गंभीर आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, अशा गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या राज्यात 300 कोटींची ऑफर राज्यपालांना दिली जाते हे स्वतः मलिक सांगत आहेत त्यावर भाजपाकडून एक शब्दही का काढला जात नाही. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती संशयाचे ढग गडद झाले आहेत. सत्यपाल मलिक हे भाजपाचेच नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर खुलासा करुन सत्य काय आहे ते जाहीर करावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे पटोले म्हणाले.