हिंगोली,दि.29: (Maratha Reservation) मराठा आरक्षणासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर खासदार पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या नावाने लिहिला आहे. यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली मात्र मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले. व लागलीच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहिला.
दिल्लीत उपोषण करणार
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा ताफा आज हदगावमध्ये अडवण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येत काही झाले नाही पाहिजे असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. त्यावर दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले.
सर्वपक्षीय आमदार-खासदारांचे एक दिवसाचे उपोषण
सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेत आरक्षणाबाबत जाब विचारला होता. तसंच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांना केली होती.
…तोपर्यंत चर्चेला या
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर सरकारकडे दोनच पर्याय राहिलेत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना तरा, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.