मनसे नेते अभिजित पानसे यांनी घेतली ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट, चर्चेला उधाण

0

मुंबई,दि.६: मनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. राज्यातील राजकारणात अजित पवारांमुळे खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकीय राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळत आहे. त्यात आता मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत असे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेत. मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी मागणी लोकांमध्ये आहेत. त्यात मनसे नेते-ठाकरे गटाचे खासदार यांच्या भेटीमुळे पुन्हा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी घेतली ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट

आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. परंतु अजित पवार यांच्या बंडामुळे मविआवर त्याचा परिणाम झाला आहे. संजय राऊत हे ठाकरे गटाचे विश्वासू नेते आहेत. त्यात मनसे नेते अभिजित पानसे यांनी राऊतांची भेट झाल्याने काही राजकीय बेरजेचे गणिते मनसे आणि ठाकरे गटाकडून जुळवण्यात येतायेत का अशी चर्चा सुरू आहे. राजकारणात काही अनपेक्षित राहिले नाही. ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे. मनसे नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती. त्यामुळे पडद्यामागून दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत का अशी चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

काय म्हणाले अभिजित पानसे?

या भेटीनंतर अभिजित पानसे यांनी सांगितले की, युतीचा प्रस्ताव घेऊन येण्याइतपत मी मोठा नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता आहे. युतीबाबत काही असेल तर त्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच बोलतील. माझ्या वैयक्तिक कामासाठी मी इथं आलो. राजकीय चर्चेचा काही संबंध नाही. राजकारणात मला संजय राऊतांनीच आणले आहे. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. वैयक्तिक स्वरुपाच्या चर्चा होत्या. ठाकरे पार्ट २ जेव्हा येईल तेव्हा मोठा कार्यक्रम घेऊन घोषणा करू असं त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसे हा एकमेव पक्ष आहे जो कुठल्याही युती, आघाडीत नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांच्या पाठिशी राज्यातील जनतेने उभे राहायला पाहिजे असं आवाहनही पानसे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here