आमदार बच्चू कडू यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.30: आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बच्चू कडू हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंद केले. उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. पण उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके ते ‘वर्षा’वर दिसत नव्हते असंही त्यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’ कट्ट्यावर बोलताना बच्चू कडू यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्यामागील कारणही सांगितलं.

तुम्ही मंत्री असतानाही अधिकाऱ्यांना कंटाळून शिंदे गटात का गेलात? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील. पण ते ‘मातोश्री’वर जितके शोभून आणि मजबूत दिसत होते तितके ते ‘वर्षा’वर नव्हते, हे खरं आहे. मी ते अनुभवत होतो. मी अंपगांचे दोन, तीन मुद्दे घेऊन गेलो होतो पण त्यासंबंधी बैठकाच झाल्या नाहीत”.

“मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेटले होते. पण सत्ता असतानाही काही राजकीय, राज्य स्तरावरील तसंच मतदारसंघातील विषयांवर योग्यपणे काम झालं नाही. तुम्ही आता राज्यमंत्री आहात, सत्तेत आहात तर मग हे काम का करत नाही? असं लोक विचारत होते. अपंग, दिव्यांग बांधव फोन करुन आपली एकही बैठक झाली नाही असं सांगायचे. या सर्व गोष्टी खटकत होत्या,” असं बच्चू कडूंनी सांगितलं. हा सर्व नवा कारभार असल्याने उद्धव ठाकरेंची अडचण होत होती. मी त्यांना दोष देणार नाही असंही ते म्हणाले.

“मी 20 ते 25 वर्षांपासून काम करत आहे. आमचा बापजादा कोणीही राजकारणी नाही. पैसा, जात-पात, धर्म कधीही राजकारणात आणला नाही. कोणत्या पक्षाचा पाठिंबाही घेतला नाही. आम्ही काही तत्वं जपली आहेत. पण राजकारणात रणनीती आखताना काही तत्वं बाजूला ठेवावी लागतात, त्याचं दु:खही असतं. पण आता व्यवस्थाच इतकी बदलली आहे की समुद्रात गोड पाणी टाकण्याला अर्थ नाही,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

“आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मी गुवाहीटाला जाऊ नये असं अनेकांना वाटत होतं. अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन आले,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“राजकुमार म्हणून आमचे एक आमदार आहेत, ते सर्वात आधी गुवाहाटीला गेले आणि नंतर मी गेलो. भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here