सोलापूर,दि.30: शिवसेना (बाळासाहेबांची) जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक झाल्यापासून त्यांनी अनेकांना शिवसेनेत सामील करून घेतले आहे. नुकतेच माजी पोलीस अधिकारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मनीष काळजे सातत्याने पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असतात. आता मनीष काळजे यांनी अक्कलकोट तालुका शिवसेनेला (ठाकरे गट) खिंडार पाडले आहे.
अक्कलकोट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणखी पंधरा पदाधिकारी राजीनामा देत आहेत, असे तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी सांगितले. शुक्रवारी तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर तालुकाउपप्रमुख प्रा. सुर्यकांत कडबगावकर यांच्यासोबत तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण, शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनुर, उपप्रमुख ताराबाई कुभांर, युवासेना शहरप्रमुख विनोद मदने, शहर उपप्रमुख महिबुब शेख, उपप्रमुख तेजस झुंजे, विभागप्रमुख उमेश पांढरे, तानाजी मोरे, उपविभाग प्रमुख समीर शेख, बसवराज कोळी, शिक्षकसेना तालुकाप्रमुख प्रा.इरण्णा धानशट्टी, व्यापारी सेना तालुकाप्रमुख मल्लिनाथ पाटील यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, सपंर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे पाठवला आहे.
यावेळी बोलताना सुर्यकांत कडबगावकर म्हणाले गेली अनेक वर्ष आम्ही शिवसेनेच काम करीत आहोत. कधी सत्तेत असताना तर कधी विरोधात असताना प्रत्येक वेळी पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यात यश ही आले हिंदुत्व आम्ही कधी सोडले नाही. परंतु कार्यकर्त्यांना बळ द्या असे वरिष्ठांना अनेकवेळा सागंतले पण त्यांनी इकडे लक्ष दिले नाही. अडीच वर्षात सत्ता होती तरीही कामे झाली नाहीत. शासकीय कमिटीच्या नेमणूक नाही, शिवभोजन थाळी आमच्या कार्यकर्त्याना न देता काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिली.
कोणतेही विकासाचे कामे झाली नाहीत , जेष्ठतेनुसार पद न देता त्यांना मानसिक त्रास देण्यात आले. हे वरिष्ठांना कळवुन सुध्दा उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असे ते म्हणाले आणि लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच प्रवेश करणार आहोत असे त्यांनी सांगितले.