कात्रज,दि.11: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आग्रही आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली सुरू आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील यांनी कात्रजमध्ये शांतता रॅली घेत राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी देखील आता मागे हटणार नाही, त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेऊन पुढे जाऊ,असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला.
काही जणांनी आपल्या समाजाला खूप हिणवले आहे. पुणेकरांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एकी नाही, असे सांगत काहीजण फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना पुणेकरांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका मीदेखील मागे हटत नाही. अशीच एकजूट दाखवा, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
काहीजणांना माज आला आहे
मुंबईतील काहीजणांना माज आला आहे, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू. तुमची लेकरं मोठी व्हावीत, यासाठीच हे सर्व सुरू आहे. आता माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी केला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला.