नांदेड,दि.२: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं असलं तरीही मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दौरे त्यांनी सुरू केले आहे. या दौऱ्यांदरम्यान, ते मराठा आरक्षणासाठी जनजागृतीचं काम करत आहेत. दरम्यान, काल (१ ऑक्टोबर) झालेल्या नांदेड येथील सभेत त्यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांना मराठ्यांनी आतापर्यंत खूप दिलं. कधीतरी मराठ्यांच्या कामाला याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आमच्यावर वेळ आली आरक्षण घ्यायची तर आम्हाला म्हणतात की ५० टक्क्याच्या आत आरक्षण येऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीकरता मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं. बरेच दिवस उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. परंतु, यावेळी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. एक महिन्याच्या अवधीत मराठ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचं त्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, हा अल्टिमेटमचा कालावधी संपत आला आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील रोज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन जाहीर सभा घेत आहेत. तसंच, आपल्या मराठा आरक्षणाची धार मजबूत करत आहेत. त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा वाढत असून येत्या काळात सरकार काय निर्णय घेतंय हे पाहावं लागणार आहे.