दक्षिणमधून धर्मराज काडादी यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी

0

मंद्रूप,दि.13: शांत, मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांना महाविकास आघाडीने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, आम्ही निश्चितच सर्वजण मिळून त्यांना निवडून आणू अशी आग्रही मागणी सोलापूर बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यासह अनेक मान्यवर नेतेमंडळींनी केली.

शुक्रवारी, होटगी येथे माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेळके बोलत होते यावेळी व्यासपीठावर श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार पवार, सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरूराज माळगे, शिवानंद पाटील (कुडल), विद्यासागर मुलगे, राजशेखर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, रमेश हसापुरे, बाळासाहेब पाटील, विजयकुमार हत्तुरे, राधाकृष्ण पाटील, ॲड. संजय गायकवाड, सिकंदरताज पाटील, बापूराव पाटील, योगीराज दिंडूरे आदी उपस्थित होते.

काडादी यांनी कोणाला कधीही त्रासही दिला नाही

शेळके म्हणाले, धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर साखर कारखाना, शिक्षण संस्था यासह इतर संस्था प्रामाणिकपणे चालवित आहेत. आज या सर्व संस्था चांगल्या प्रगतीपथावर आहेत. काडादी यांनी सामाजिक जीवन जगताना कोणावरही अन्याय केला नाही अथवा कोणाला कधीही त्रासही दिला नाही. नेहमीच त्यांनी शेतकरी, कामगार, सभासद बांधव‌ आणि नागरिकांचे हित जोपासले आहे. कै. आनंदराव देवकते, वि. गु. शिवदारे, गुरूनाथ पाटील, दिनानाथ कमळे, भीमराव पाटील-वडकबाळकर, सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण तालुक्यात नेहमीच वैचारिक आणि विकासात्मक राजकारण केले आहे. आज दक्षिण सोलापूर तालुका नेतृत्व बदलाचे परिणाम पाहत आहे. तालुक्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी काडादी सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काडादी यांच्या सारख्या सर्व समावेशक व्यक्तीमत्वाची खरी गरज आहे. दक्षिण आज त्यांची वाट पाहत आहे, काडादी यांनी जनतेची भावना लक्षात घेऊन दक्षिणची विधानसभा लढवावी आम्ही सर्वजण मिळून त्यांना निवडून आणू असे त्यांनी शेवटी बोलताना नमूद केले.

यावेळी माजी सभापती जमादार म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुक्याची आज फरफट सुरू आहे. तालुका दिशाहीन होत आहे. जुन्या नेत्यांच्या विचारधारेचा नव्या पिढीतील नेतेमंडळींना विसर पडला आहे. तेव्हा काडादी यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाची आज दक्षिणला गरज‌ आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे. यावेळी अॅड. गायकवाड म्हणाले, आज दक्षिण सोलापूरची अवस्था वाईट झाली आहे. कोणीही येऊन आपल्यावर राज्य करीत आहे. या तालुक्याची राजकीय स्थिती खूपच बिघडली आहे. तालुक्यात विकास कामांचा दुष्काळ पडला आहे. तालुका एकसंध आणि एका विचारात बांधण्यासाठी काडादी यांनी दक्षिणमधून विधानसभा लढविणे गरजेचे आहे. त्याशिवाय तालुक्याचे भाग्य बदलणार नाही. यावेळी उपस्थित जनतेने टाळ्यांच्या गजरात काडादी यांच्या नावाला पाठिंबा‌ दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कोकरे यांनी केले तर आभार दत्तात्रय घोडके यांनी आभार मानले.

चांगल्या नेतृत्वाला निवडून आणू: काडादी

खरं तर येथे माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण आलो होतो, पण येथे सर्वजण मी विधानसभा लढवावी अशी मागणी करीत आहेत. जर मला येथे आल्यावर अशी मागणी होणार आहे असे पहिलेच समजले असते तर मी येथे आलो नसतो. आज दक्षिण सोलापूरला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे‌. यापूर्वी तालुक्यात कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी ‌‌१९५२ मध्ये दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या संयुक्त मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर यश मिळवत प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते. १९६२ साली अप्पासाहेब काडादी हे खासदार म्हणून विजयी झाले होते. १९६७ मध्ये माझे वडील अण्णाराज काडादी यांनी दक्षिण सोलापूर-अक्कलकोट या संयुक्त मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता, नंतर त्यांनी तो अर्ज माघारी घेतला होता. दक्षिण सोलापूरमध्ये वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, गुरुनाथ पाटील, दिनानाथ कमळे, सुशीलकुमार शिंदे यांनी चांगले काम केले आहेत. या सर्वांनी तालुक्याचा चांगला विकास केला होता. त्यांनी अनेक मोठे प्रकल्प तालुक्यात आणले होते.

गेल्या दहा वर्षांत भाजपने दक्षिण सोलापूर आणि जिल्ह्याचा विकास केला नाही, उलट सर्वांनाच त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दक्षिण सोलापूर तालुका हा जिल्ह्याच्या टेलएंडला आहे त्यामुळे म्हणावा तसा विकास झाला नाही. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या चांगल्या नेतृत्वाची दक्षिणला आता गरज आहे. महाविकास आघाडीने असाच सर्वसमावेशक उमेदवार येथे देणे गरजेचे आहे. त्या उमेदवाराला आम्ही सर्वजण मिळून निश्चितच निवडून आणू. मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिली, तशीच साथ आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला द्यावी अशी आपली अपेक्षा आहे. असे धर्मराज काडादी म्हणाले.

भावना वरिष्ठांना कळवू: पवार

दक्षिण सोलापूर तालुक्याला चांगला इतिहास आहे येथील नेतेमंडळी गांधीवादी विचाराचे होते.आज तालुक्याला पुन्हा या विचाराची गरज आहे.धर्मराज काडादी हे आदर्श व्यक्तीमत्व आहे.तुमची मागणी मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवू असे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी यावेळी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here