मुंबई,दि.१: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. समृद्धी महामार्गावर (Samriddhi Mahamarg Accident) खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास लोक असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला
शरद पवार म्हणाले, या महामार्गाचे सायंटीफिक नियोजन केलं नसावं, त्याचाच दुष्परिणाम लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आता चर्चा अशी आहे एखादा अपघात झाला आणि एखादा मृ्त्यूमुखी पडला की लोक असं म्हणतात की तो देवेंद्रवासी झाला, असा टोला पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. हा महामार्ग करत असतानाच्या काळात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत न कळत दोषी ठरवतात. ही घटना दुख:द आहे, या घटना सतत होत आहेत. अपघात झाला आणि राज्यसरकारने ५ लाख रुपये दिले हे आम्ही सतत ऐकतो. हे पाच लाख देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. झाले हे आतापर्यंत वाईट झालं.
‘या देशात रस्त्यांसंदर्भात एक टीम करावी. काय चूक झालेली आहे ती चूक शोधून काढावी. हे अपघात थांबायला हवेत. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. अपघात थांबायला पाहिजेत, असंही शरद पवार म्हणाले.
‘या रस्त्याची राज्यभर चर्चा झाली, उदोउदो झाला. पण आम्हला सतत्याने अपघात बघायला मिळत आहेत आणि कदाचित या रस्त्याचे वैज्ञानिकरित्या नियोजन केलेलं नसावं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून लोक मृत्यूमुखी पडत आहेत, असंही पवार म्हणाले.