‘या सरकारचे हायकमांड एकनाथ शिंदे आहेत’ संजय शिरसाट

0

छत्रपती संभाजीनगर,दि.16: राज्य सरकारचे हायकमांड कोण यावरून भाजपा आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. शिंदे सरकारचे हायकमांड देवेंद्र फडणवीस हेच आहेत. कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीस यांना चांगलंच समजतं. यामुळे समजनेवाले को इशारा काफी होता है, असं सूचक विधान भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलं होतं. गोरे यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरच हे सरकार चालत असल्याचं गोरे यांना एकप्रकारे सूचवायचं असल्याची चर्चा सुरू असून गोरे यांच्या या विधानाने शिंदे गटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्द्यावरून पलटवार केला आहे. त्यामुळे हायकमांडच्या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

या सरकारचे हायकमांड एकनाथ शिंदे

आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा पलटवार केला. या सरकारचे हायकमांड एकनाथ शिंदे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यांचे सहकारी आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गोरे हे शिरसाट यांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमची कोंडी होत नाही

अजित पवारांकडे अर्थखातं गेल्याने निधी मिळणार का? असा सवाल संजय शिरसाट यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची कोंडी होत नाही. कालच नाशिकच्या सभेत अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. मागचे मुख्यमंत्री घरात बसल्याने तिढा निर्माण झाला. ते कुणाशी बोलत नव्हते, भेटत नव्हते. आणि फोन घेत नव्हते. आता ती परिस्थिती नाहीये. आता अनेक वेळेला एकमेकांशी संवाद साधणं आणि एखाद्या गोष्टीवर निर्णय घेणं ही प्रक्रिया फास्ट होते. त्यामुळे अजितदादांकडे एखादं खातं गेलं तर काही तरी झालं बाबा असं नाही. अजितदादा सक्षमपणे खातं चालवतील आणि सर्वांना न्याय देईल असा विश्वास आहे. अजितदादांशी वैयक्तिक काहीच नाहीये, असं शिरसाट म्हणाले.

तर आमदारकी सोडेन

उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते. भेटत नव्हते. आम्ही अजितदादांकडे जायचो तर ते म्हणायचे उद्धव साहेबांना सांगा. रिमार्क्स आणा. मी तुम्हाला निधी देतो. पण उद्धव ठाकरे रिमार्क देतच नव्हते. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांची माझ्या एकाही पत्रावर एक जरी सही दाखवली तरी मी आमदारकी सोडेन, असा दावा त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here