मुंबई,दि.७: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचाही मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांचा गट बनवून आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. तसेच महायुतीत प्रवेश करून त्यांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. परंतु अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाची (शिवसेना) गोची झाली असल्याचं बोललं जात आहे. मुळात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळूनच आपण शिवसेनेत उठाव केल्याचं सातत्याने शिंदे गटाकडून सांगितलं जात होतं. आता तेच अजित पवार त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट कोंडीत सापडला आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातील असं बोललं जात आहे. तसेच आता एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाईल. केवळ भाजपा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत बसेल, असा दावा ठाकरे गटातील नेत्यांकडून केला जात आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी यांचा मोठा दावा
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीदेखील व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या सर्व शक्यतांबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळापूर्वी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. आज सकाळी त्यांच्यापैकी चार आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.
काय म्हणाले खासदार संजय राऊत?
खासदार संजय राऊत म्हणाले, शिंदे गटातले १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे खोटं असेल तर पुन्हा शिवसेनेचं नाव घेणार नाही. तिकडचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. आजही त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोलले.
संजय राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या व्यथा ऐकतो, कारण ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी अनेक वर्ष आमच्याबरोबर काम केलं आहे. आमचे जुने संबंध आहेत. मधल्या काळात आमचा एकमेकांशी संपर्क नव्हता. परंतु गेल्या आठ दिवसापासून ते आमच्याशी संपर्क करत आहेत. आम्ही असं म्हणत नाही की, ते आमच्याकडे आले आहेत किंवा आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं आहे. कारण, तो निर्णय आमच्या पक्षप्रमुखांचा असेल.