मुंबई,दि.1: राज्यात पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तळकोकणासह खेड, दापोली भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, मुसळधार पावसामुळं मुंबई-गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुण्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, राज्यात ३ तारखेनंतर पावसाचा जोर कमी ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भरणे नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला आहे. महामार्गावर आणि ठिकाणी गाड्या थांबल्या आहेत तर मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी गटारांची काम अर्धवट ठेवल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहायला मिळते.