मुंबई,दि.18: Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 40 आमदार असल्याचीही चर्चा रंगली होती. अजित पवार यांच्यासोबत सध्या 15च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे. अजित पवार विधानभवन परिसरात रवाना झाले असून तिथे ते काही आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अजित पवारांच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण | Sharad Pawar On Ajit Pawar
अजित पवारांनी या बातम्यांमध्ये कुठेलेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही. मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचं सांगत माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांची हवाच शरद पवारांनी काढली.
15 दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी 15 दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर ‘तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर ‘हे दादांनाच विचारा…मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्याने अजितदादा सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं.
अजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. 2019 रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.