NCP Crisis News: अजित पवार गटाचे तीन आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत?

0

मुंबई,दि.13: NCP Crisis News: अजित पवार गटाचे तीन आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे माहिती समोर येत आहे. अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अनेक आमदारांनी अजित पवारांची साथ दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा अखेर सुटला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होणार आहे. तर खाते वाटप आज किंवा उद्या केलं जाणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागलं आहे. नव्या विस्तारात तिन्ही पक्षाच्या वाट्याला कमी मंत्रिपदं येणार आहेत. त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त दोनच मंत्रिपदं येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच आता धुसफूस वाढली आहे. सत्तेसाठी भाजपसोबत आलो आणि सत्तेचा वाटा मिळत नसल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये धुसफूस वाढली आहे. तीन आमदारांनी तर नाराजी व्यक्त केली असून वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीत फूट पडून आठ दिवस झाले नाही तोच अजित पवार यांच्या गटात धुसफूस निर्माण झाली आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने माणिकराव कोकाटे, अतुल बेनके आणि किरण लहामटे या तीन आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या तिन्ही आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ते वाटा मिळत नसल्याने हे तिन्ही आमदार नाराज आहेत. अजित पवार यांच्यासोबत जाताना मंत्रिपद मिळेल अशी या आमदारांना अपेक्षा होती. पण त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे.

नाराजी मागचं एक कारण… | NCP Crisis News

नाराजी मागचं एक कारण म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा आहे, अशांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. ज्यांनी अनेक वर्ष मंत्रिपदं भोगली आहेत, अशा आमदारांनाच मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यामुळे या आमदारांमध्ये नाराजी आहे. शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला सोडून आल्यानंतरही सत्तेत वाटा मिळत नसेल तर वेगळी भूमिका घेणच योग्य असं या आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे या आमदारांची समजूत काढणं अजित पवार यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तारावरून वाद

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेचा वाटा मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला वजनदार आणि मलाईदार खाती देण्यास शिंदे गटाने विरोध केला आहे. या मुद्द्यावरून शिंदे गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीसमोर झुकायचं नाही, असा पवित्राच शिंदे गटाच्या आमदारांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. दिल्लीचे ऐकायचे की आपल्या आमदारांचे ऐकायचे? अशा कात्रीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सापडल्याचं सांगितलं जात आहे.

विस्तार रखडला

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण हा विस्तार आता रखडला आहे. हा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खाते वाटप आज किंवा उद्याच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here