मुंबई,दि.१९: भाजपाकडे अजित पवारांच्या पक्षप्रवेशाबाबतचा प्रस्ताव आलेला नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली असल्याचीही चर्चा सुरू होती. तसेच अजित पवार पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील, असंही बोललं जात होतं.
या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्वत: अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. मी बंडखोरी करणार असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असं विधान अजित पवारांनी केलं.
काय म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे?
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विषयी वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठेला तडा जाईल असा कुठलाही विषय नाही. चर्चा का होतेय कळत नाही. जर भाजपाकडे विषय नाही, अजित पवारांकडे विषय नाही. मग चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव आणि किंचित विचारही आमच्यासमोर आला नाही. त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल. कुणाला पक्षात यायचे असेल तर तेव्हा निर्णय घेऊ. आज पक्षासमोर अजित पवारांचा काही विषयच नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
अजित पवारांच्या नेतृत्वावर कोण प्रश्न चिन्ह उपस्थित करतंय?
भाजपाकडे अजित पवारांच्या पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर कोण प्रश्न चिन्ह उपस्थित करतंय हे त्यांनीच तपासलं पाहिजे. आमच्याकडे अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. अजित पवारांची कुठेही भाजपाला संपर्क केला नाही. दोन वर्षांपासून त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे पवारांच्या भेटीनंतरच या चर्चांना उधाणं आलं, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.