मुंबई,दि.5: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणूक जागा वाटपावरून मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाल्याचं चित्र आहे. राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी पक्ष कुणाचा अन् घडाळ्यावर अधिकार कुणाचा याचा दुसरा अंक आता सुरू होणार आहे. अशातच अजित पवारांनी त्यांच्या आजच्या भाषणात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी 90 जागा लढवेल आणि 71 हून अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसेभेच्या निवडणुका झाल्यास भाजप किती जागा लढवणार आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार याची पडद्यामागे चर्चा सुरू आहे.
अजित पवार काय म्हणाले?
आज झालेल्या सभेमध्ये अजित पवार म्हणाले की, या पुढच्या निवडणुका या घडाळ्याच्या चिन्हावर लढल्या जातील आणि राष्ट्रवादी राज्यातील 90 जागा लढवेल. त्यापैकी 71 हून अधिक जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. तसेच पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
शिंदे गटाला किती जागा?
राज्यातील सत्तेत मुख्यमत्री ज्या पक्षाचा आहे त्या शिवसेना शिंदे गटामध्ये मात्र यानंतर चलबिचल सुरू झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 50 आमदार आहेत, पण जागावाटपामध्ये त्यांना तेवढं महत्व मिळेल का नाही याबद्दल त्यांच्यामध्ये संदिग्धता कायम आहे. कारण या आधी, मार्च महिन्यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. भाजप 240 जागा लढवणार आणि शिंदे गटाला 48 जागा दिल्या जातील असं ते म्हणाले होते.
आता अजित पवार 90 जागांवर लढणार म्हणतात, तर मग भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं काय? भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. तर त्यांच्या मित्रपक्षाचे, त्यांना पाठिंबा दिलेले 15-20 आमदार आहेत. मग त्यांचं काय? या सगळ्याची गोळाबेरीज केली तर भाजप किमान 150 ते 160 जागा लढवणार हे नक्की, त्यापेक्षा कमी जागा घेऊन स्वतःचं नुकसान करुन घेणार नाही.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांपैकी जर अजित पवार यांची राष्ट्रवादी 90 जागा लढवणार असेल तर उरलेल्या 198 जागांमध्ये भाजप आणि शिवसेनेला जागावाटप करावं लागेल. त्यापैकी भाजपने जरी किमान 150 जागा लढवल्या तर शिंदे गटाकडे केवळ 48 जागा उरतील. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदे गटाला 48 जागाच दिल्या जाण्याची शक्यता आहे.