Home महाराष्ट्र महाराष्ट्रात पावसाचा तांडव, पुढील २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा तांडव, पुढील २४ तासांत ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई,दि.२९: दीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तास आणि येत्या ५ दिवसांसाठी संपूर्ण राज्यात अलर्ट जारी केला आहे.

शाळांना सुट्टी आणि ऑरेंज अलर्ट

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने २९ जुलै रोजी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

धरणांचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना इशारा

गोंदियातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात ४,८६२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील गोदाकाठच्या सर्व गावांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

इतर जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती

घाटमाथा आणि कोकण: पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक वाढेल.

विजेच्या कडकडाटासह पाऊस: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली, जालना आणि कोल्हापूर-पुणे घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

येलो अलर्ट जारी असलेले जिल्हे: सोलापूर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे शहर, सातारा, अहिल्यानगर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जून महिना कोरडा गेल्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील या सर्वदूर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. अनुपगढ, पिलानी आणि दाल्तोगंज भागात सक्रिय झालेल्या वादळी वाऱ्याच्या प्रणालीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील ५ दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.