Survey: सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेचा कौल या नेत्याला

0

मुंबई,दि.28: Survey: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल कधीही लागू शकतो. एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र झाल्यानंतर राज्यात पुन्हा नवे मुख्यमंत्री म्हणून जनतेचा कौल उद्धव ठाकरे यांना आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार समोर येत आहेत. शिवसेनेतून बंड करत भाजपच्या (BJP) साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदी विराजमान झाले. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा पहिला अंक रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे असं वातावरण पाहायला मिळालं होतं. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष एकनाथ शिंदेंवर होतं. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेचा विषय बनले आहेत. (ABP C Voter Survey)

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागेल, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जात आहे. केवळ शक्यताच नाहीतर अनेक नेत्यांकडून लवकरच शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच एकनाथ शिंदे पायउतार झाले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? असा प्रश्नही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. या प्रश्नावर बोलताना लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शिंदे अपात्र झाल्यास नवे मुख्यमंत्री कोण? | Survey

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) : 26 टक्के
अजित पवार (Ajit Pawar) : 11 टक्के
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) : 28 टक्के
माहित नाही : 35 टक्के

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती

एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनाच जनतेची पहिली पसंती असल्याचं सी-व्होटरच्या सर्वेक्षणाच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. 26 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. तर 11 टक्के लोकांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून आपली निवड केल्याचं सांगितलं आहे. मात्र, 35 टक्के लोकांना मुख्यमंत्री कोणी व्हावं याबाबत काहीच अंदाज नसल्यामुळे त्यांनी शिंदे पायउतार झाल्यास त्यांच्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी विराजमान व्हावं हे भविष्यावर सोडलं आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तेव्हापासूनच जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणातूनही तेच समोर आलं. त्यामुळे सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार जनतेला उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे.

सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. जलद राजकीय प्रश्नांवर ऑल इंडिया सर्वे सोमवार (24 एप्रिल) ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आला. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here