नवी दिल्ली,दि.१३: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी (13 डिसेंबर) सुरक्षेत मोठी चूक घडली. लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुण अचानक संसदेत घुसले आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेतली, तसेच त्यांनी स्मोक कँडलही फोडला. काही वेळातच दोन्ही हल्लेखोर पकडले गेले. यावेळी काही खासदारांनी त्यांना बेदम चोपही दिला.
लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले आणि त्यांनी टेबलावरुन सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचे स्मोक कँडलही फोडले. यावेळी खासदार हनुमान बेनिवाल, मनोज कोटक, मलूक नागर यांच्यासह काही खासदारांनी त्या आरोपींना पकडले. यावेळी खासदारांनी आरोपीला बेदम चोपही दिला.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते बाकावर चढले आणि स्मोक कँडलही फोडले. सुरुवातीला आमच्या काही सहकारी खासदारांनी त्यांना पकडले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी त्या दोघांना बाहेर घेऊन गेले.
प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा काय म्हणाले?
प्रेक्षक गॅलरीत उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा यांनी सांगितले की, आम्ही लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलो होतो. आम्ही पहिल्या गॅलरीत होतो. आरोपी गॅलरी दोनमध्ये होता. त्याने अचानक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडले. खासदारांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला, यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपींमध्ये कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये सागर शर्मा(रा. लखनौ, उत्तर प्रदेश), अमोल शिंदे(रा. लातूर, महाराष्ट्र), नीलम सिंह(रा. हरियाण), मनोरंज गौडा(रा.म्हैसूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आणखी कोण कोण होते, याचा शोध घेतला जातोय. दिल्ली पोलीस आणि आयबी आरोपींची चौकशी करत आहे.