Jhimma 2: ‘झिम्मा 2’ या सिनेमाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई,दि.14: ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय, गाणी, दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अशातच आता या बहुचर्चित सिनेमाचा नवा ट्रेलर आऊट झाला. ‘झिम्मा 2’चा नवीन ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘झिम्मा 2’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित | Jhimma 2

बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमांना टक्कर देत ‘झिम्मा 2’ने आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या सिनेमाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खूप भावनिक अशा या ट्रेलरमध्ये आयुष्यात जिवाभावाची मैत्री किती महत्वाची असते, हे दिसतेय. अशा जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील तर सगळया अडचणी क्षुल्लक वाटू लागतात. नात्यांची वीण घट्ट करणारा हा ट्रेलर मनाला स्पर्शून जाणारा आहे.

‘झिम्मा 2’ या सिनेमात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने वर्षाच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.

‘झिम्मा 2’ या सिनेमाला मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) म्हणाला,”यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मुळात आता हा सिनेमा आमचा राहिला नसून हा तुम्हा सर्वांचा झाला आहे. आयुष्यात मैत्री असेल तर खूप गोष्टी सरळ, सोप्या होतात. मग ते नाते कोणतेही असो. आई मुलीचे, सासू सुनेचे अथवा नवरा बायकोचे”.

हेमंत पुढे म्हणतो,”मैत्री असणे खूप महत्वाचे. कोणत्याही अडचणींवर मैत्रीची हळुवार फुंकर मारली की आपोआप सगळं सुरळीत होते. हा नवीन ट्रेलर पाहून तुम्हालाही तुमच्या घनिष्ट मैत्रीची आठवण आल्या वाचून राहणार नाही. आतापर्यंत प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी ‘झिम्मा 2’ पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा सिनेमा पाहावा”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here