केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली का; जयंत पाटील म्हणाले…

0

मुंबई,दि.6: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं झाली असून पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. माझी कुणाशीही भेट झाली नाही. भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी शाह यांना भेटल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली का

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

मी काही सांगितलं का तुम्हाला?

बातम्या तुम्हीच तयार केल्या. मी काही सांगितलं का तुम्हाला? तुम्ही रोज काहीही चालवाल आणि त्याला मी रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा का? असा सवाल करतानाच तुम्ही बातम्या दिल्या. तुम्हीच त्याचा एंड करा. मी कुठे गेलो त्याचे पुरावे आहेत का? पुरावे असतील तर त्यावर बातम्या करा. रोज उठून तुम्ही बातम्या करून महाराष्ट्रात गैरसमज केला तर कसं होणार? असा सवाल त्यांनी केला.

तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे

सकाळापासून माझं मनोरंजन होत आहे. मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी पुण्याला गेलो, अशा सर्व बातम्या येत आहेत. तुम्ही माझं मनोरंजन केलं. चुकीची का होईना पण मला आज प्रसिद्धी मिळाली. ज्यांनी घरात बसून अशा बातम्या तयार केल्या, त्या तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

रात्री दीडपर्यंत घरीच

अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सुनील भुसारा मी रात्री एक दीड वाजेपर्यंत माझ्या घरात होतो. सकाळी शरद पवार यांच्यासोबत होतो. काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी कुठे गेलो? चर्चा तुम्ही केल्या. तुम्हीच त्याचं उत्तर द्या. मी कुणाला भेटलो असं काही आहे का? तुम्ही परस्पर बातम्या केल्या तर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होईल, असंही ते म्हणाले.

जयंत पाटील भुलले अशी बातमी चालवली

कुणाला भेटायचं असेल तर तुम्हाला सांगेल ना. तुम्हाला सांगूनच जाईल. एका प्रसिद्ध ब्लॉगरने जयंत पाटील भुलले अशी बातमी चालवली. एका चॅनलनेही मी शाह यांना भेटल्याची बातमी चालवली. माझी प्रसिद्धी तुम्ही करताय त्याबद्दल तुमचे आभारच, असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवार गट, भाजप गट बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. बातम्या पेरणारे तुम्ही. त्यांना बडबडून काही उपयोग नाही. कुणी बातम्या पेरल्या याची माहिती माझ्याकडे नाही, असं सांगतानाच माझा पक्ष मोठा व्हावा हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी जे करायचं ते मी करतोय, असंही त्यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here