UPSC परीक्षेत सोलापूरचा अनय नावंदर देशात ३२ वा तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

0

सोलापूर,दि.३१: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) सोलापूरच्या अनय नितीन नावंदर याने देशात ३२ व्या रँकने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. तो राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कोणाकडेही क्लास न लावता अनय याने घरीच स्वतः तयारी करून हे यश मिळविले.

टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्यूच्या माध्यमातून त्याने हे यश खेचून आणले. चौथीपर्यंत सोलापुरातील सेंट जोसेफ, त्यानंतर दहावीपर्यंत माझलगाव व अकरावी, बारावी शिक्षण ए. डी. जोशी यांचे आय. एम. एस. येथे झाले. मुंबई येथील आयसीटीमधून त्याने २०१९ केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

त्यानंतर गेनमार्क फॉर्मामध्ये चार महिने नोकरी करून राजीनामा दिला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्याने या परीक्षेत यश मिळविले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अनय नावंदर याचे वडील नितीन नावंदर हे चार्टर्ड अर्कोटंट (CA) असून आई अपर्णा नावंदर या अलिबागला न्यायाधीश आहेत. बहीण निधी नावंदर ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

अनयला जैविक शेतीमध्ये आवड असून रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या अति वापरामुळे वाढत असलेले कॅन्सरचे प्रमाण त्याला कमी करायचे आहे. पशू पक्ष्यांनाही त्याचा धोका असल्याने जैविक शेतीमध्ये काहीतरी वेगळे करून दाखविण्याची मनीषा त्याने व्यक्त केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी बाबत विद्यार्थ्यांनी मनातील गैरसमज दूर करावा. स्वतःचा वेगळा दृष्टिकोन तयार करून यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आणि त्यांचे ब्लॉग वाचावेत, असे अनय नावंदर याने आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here