२१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला साडेपाच हजार योग साधक सहभाग घेणार

सुधा अळळीमोरे यांची माहिती

0

सोलापूर,दि.९: सोलापूर जिल्हा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, किसान सेवा समिती या पाच संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा मध्ये ७६ निशुल्क दैनिक योग वर्ग चालतात. यापैकी सोलापूर शहरांमध्ये ४६ दैनिक योग वर्ग विविध ठिकाणी चालतात. येत्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला साडेपाच हजार योग साधक सहभाग घेणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योग पीठ हरिद्वारच्या केंद्रीय महिला प्रभारी तथा वरिष्ठ महाराष्ट्र राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले.

२१ जून रोजी होणाऱ्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ४३ दिवस बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि पतंजली योग समिती सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आज सकाळी ६ ते ७:३० वाजता जुळे सोलापूर येथील ए डी जोशी शाळेच्या प्रांगणात आयोजित प्रथमेश प्राणायाम योग वर्गाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

आंतरराष्ट्रीय योग दिन

यावेळी व्यासपीठावर भारत सरकारचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण, सहायक क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, भारत स्वाभिमान संघटनेचे जिल्हा प्रभारी सुरेंद्र पिसे, पतंजली जिल्हा कोषाध्यक्ष रघुनंदन भुतडा, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विशाल गायकवाड,महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सुजाता शास्त्री, युवा भारत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन कुंभार, किसान सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष बनसोडे आणि संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अळळीमोरे म्हणाल्या की, निशुल्क योग वर्गाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो वृद्ध, महिला, युवक आणि लहान मुले योगाचे धडे घेऊन आपले आरोग्य सांभाळतात. पतंजली योगशिक्षकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात योगाचा प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. योगाचे धडे देण्याबरोबरच आयुर्वेद, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, स्वदेशी चे महत्व, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ही समाज उपयोगी कार्य ही पतंजली परिवाराच्या माध्यमातून करण्यात येतात.

चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन आणि केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने जिल्हास्तरीय ९व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजनाबाबत माहिती दिली आणि योग दिनाला मोठ्या प्रमाणत सहपरिवार सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मल्लिकार्जुन भरमशेट्टी आणि आभार परबतराव ताई यांनी केले. स्वागत गीत व योगाचे प्रात्यक्षिक संजवाड दक्षिण सोलापुरच्या सरपंच सुजाता सुतार (शास्त्री) यांनी गायले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश वर्गाचे योग गुरू मल्लिनाथ आतनुरे, रक्षिता प्राणायाम वर्गाच्या मंगल शेळके, शिवगुंडे, सत्तुबार, शिंदे, चव्हाण, कुलकर्णी, निंबरगी, लोढे आणि ढवणे यांनी घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here