ईपीएफओने पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया केली सुलभ

0

नवी दिल्ली,दि.२७: ईपीएफओने पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. अचानक आलेल्या संकटात किंवा गंभीर उपचारांसाठी  गरज पडल्यानंतर अनेकजण भविष्य़ निर्वाह निधीतील (पीएफ) पैसे काढण्याचा पर्याय निवडतात. परंतु यासाठी केलेला दावा फेटाळण्यात आल्याने हक्कांचे पैसे असूनही खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो.  असा दावा पुन्हा पुन्हा फेटाळल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु आता तसे होणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ खात्यामधील पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. क्षेत्रीय कार्यालयाला दावा एकापेक्षा अधिक वेळा फेटाळून लावता येणार नाही तसेच केलेल्या दाव्याचा निपटाराही निर्धारित वेळेत होईल. 

ईपीएफओने यासंबंधी आवश्यक मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय कार्यालयांना जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की,  पैसे काढण्याचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत. एकच दावा अनेक आधारांवर वारंवार फेटाळण्यात येऊ नये. प्रत्येक दाव्याची पहिल्या वेळीच संपूर्ण तपासणी करण्यात यावी. दावा फेटाळला जात असेल, तर त्याचे स्पष्ट कारण ईपीएफओ सदस्यास कळविण्यात यावे.

पैसे काढताना काय आहेत अटी? 

काढण्यात येणाऱ्या पैशांची रक्कम एकूण जमा रकमेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी.
विवाह आणि शिक्षण यासाठी ३ पेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाहीत.
खाते उघडल्यानंतर ५ वर्षांच्या आत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास काढलेल्या रकमेवर १०% टीडीएस कापला जाईल. 
पॅन क्रमांक नसल्यास काढलेल्या रकमेवर ३० टक्के टीडीएस लागेल.

दर महिन्याला अहवाल पाठवा

खातेधारकाकडून पीएफ काढून घेण्याबाबत ईपीएफओने वेळोवेळी आपल्या कार्यालयांना दिशानिर्देश जारी केले आहेत. 

खातेधारकाकडून खात्यातील रक्कम काढण्यास केलेला दावा वेळेत निकाली काढण्यात न आल्यास याची संपूर्ण जबाबदारी क्षेत्रीय किंवा अतिरिक्त पीएफ आयुक्तांवर असणार आहे. 

खातेधारकांकडून या रकमेसाठी केलेले दावे अस्वीकृत करण्यात आले असतील तर यासंदर्भातील अहवाल दर महिन्याला पुनरावलोकनासाठी पाठवण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

किती रक्कम काढता येते?

तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेली रक्कम पूर्णपणे किंवा त्यातील काही भाग काढता येतो. 

कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तसेच सलग दोन महिन्यांहून अधिक काळासाठी बेरोजगार असेल तरी त्याला पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढता येते. 

केवळ एका महिन्यासाठी बेरोजगार असल्यास पीएफ खात्यातील ७५ टक्के रक्कम काढता येते. 

आजारपणातील उपचार, आपत्कालीन स्थिती, मुला-मुलींचे लग्न, गृहकर्जाची परतफेड आदी परिस्थितीमध्येही पीएफ खात्यातील काही रक्कम खातेधारकाला काढता येते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here