अजित पवारांच्या अधिकारांवर आणलेल्या मर्यादांबाबत एकनाथ खडसेंचे मोठं विधान

0

मुंबई,दि.१: अजित पवारांच्या अधिकारांवर आणलेल्या मर्यादांबाबत एकनाथ खडसेंनी मोठं विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गट आणि भाजपाचे काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने अनेक नेत्यांची मंत्रीपदं दूर गेली आहेत. यामुळे शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रीपदावरील दावा सोडावा लागला आहे. दरम्यान, आता मंत्रीपदावरून शिंदे गटाचे नेते दादा भुसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच असल्याचं दिसत आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसेंचे मोठं विधान

सरकारमधील नेत्यांमध्ये आपसात अनेक भानगडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना चपराकच मारली आहे. अजित पवारांचे अधिकार काढून घेतल्यासारखी स्थिती आहे. अजित पवारांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, “सरकारमधील नेत्यांमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. जसं आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना चपराकच मारली आहे. अजित पवारांचे अधिकार काढून घेतल्यासारखंच झालं आहे. अजित पवारांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत. मी अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. अर्थमंत्री म्हणून मला माझे अधिकार माहीत होते. पण अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून जे अधिकार दिले आहेत, त्यावर आता फडणवीसांचं नियंत्रण राहील.”

“म्हणजेच यापुढे अजित पवारांची प्रत्येक फाईल आधी देवेंद्र फडणवीसांकडे जाईल, मग मुख्यमंत्र्यांकडे जाईल. पूर्वी वित्तमंत्र्यांची फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे जावी, असा नियम आहे. पण सध्या फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. ते सिनिअर उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यावर (अजित पवार) वचक ठेवण्यासाठी सिनिअर उपमुख्यमंत्र्यांची सही लागेल. म्हणजे एकप्रकारे अजित पवारांची मानहानी करण्याचा हा प्रयत्न आहे,” असंही एकनाथ खडसे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here