मुंबई,दि.१५: Devendra Fadnavis On Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही हिंदी चित्रपटांच्या यशासाठी ट्वीट केल्याचं पाहायला मिळालं. ‘द केरला स्टोरी’वरून सुरू झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. नंतर ‘सावरकर’ या चित्रपटासाठीही त्यांनी ट्वीट केलं होतं. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या यशासाठीही असंच ट्वीट केलं आहे. हा चित्रपट येत्या १६ जून रोजी अर्थात शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यातील काही घटना प्रेक्षकांसमोर या चित्रपटाच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या आहेत. या चित्रपटाच्या यशासाठी ट्वीट करताना देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमलाही शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट | Devendra Fadnavis On Adipurush
या ट्वीटमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस एका कार्यालयातल्या टेबलवर मोठ्या डेस्कटॉपवर आदिपुरुषचा ट्रेलर बघताना दिसत आहेत. या फोटोसह फडणवीसांनी आदिपुरुषच्या टीमला शुभेच्छा देणारं ट्वीट केलं आहे.
“मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर आदिपुरुष प्रभू श्रीराम यांची कृपा व्हावी ही प्रार्थना. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा!” असं ट्वीट करून त्यात मनोज मुंतशीर यांना टॅगदेखील करण्यात आलं आहे.
कधी, कुठे प्रदर्शित होणार चित्रपट
आदिपुरुष हा चित्रपट येत्या १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच, पुढील ५० दिवसांनतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दाखवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अॅमेझॉन प्राईमशी याबाबत करार झाल्याचंही वृत्त आहे. या चित्रपटाट क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत तर प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. सैफ अली खाननं चित्रपटात रावणाची व्यक्तीरेखा साकारली आहे.
याआधी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरील वादानंतर त्यासाठी ट्वीट केलं होतं. या चित्रपटातून कशा प्रकारे वास्तव मांडण्यात आलं आहे, याचा दावा फडणवीसांनी आपल्या ट्वीटमधून केला होता. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘सावरकर’ या चित्रपटासाठीही फडणवीसांनी सावरकर जयंतीच्या दिवशी ट्वीट केलं होतं. आता आदिपुरुषसाठी फडणवीसांनी केलेल्या ट्वीटला नेटिझन्सचा प्रतिसाद मिळत आहे.