सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांचं मोठं वक्तव्य; या देशात जो निवृत्त होत आहे त्याला किंमत नाही

0

दि.24: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (CJI NV Ramana) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. देशातील अनेक संवेदनशील मुद्यांवर रोखठोक भूमिका आपल्या भाषणांमधून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा सातत्याने व्यक्त करत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. या देशामध्ये जो निवृत्त झाला आहे किंवा जो निवृत्त होणार आहे त्याला या देशात काहीच किंमत नसल्याचे रमण्णा यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्यांचा कार्यकाल अजून दोन दिवस आहे. काल त्यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची घोषणा केली होती. गुरुवारी या प्रकरणी आता घटनापीठापुढे सुनावणी होईल. शुक्रवारी ते सेवानिवृत्त होतील.

सर्वोच्च न्यायालयात आज राजकीय पक्षांकडून होणाऱ्या मोफतच्या घोषणांवरून सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी निवृत्तीवरून भाष्य केले. राजकीय पक्षांकडून होणाऱ्या मोफत्या घोषणांवरून सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सुनावणी करताना सिनिअर ॲडव्होकेट विकास सिंह यांनी अशा प्रकारची समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली असावी, असे मत मांडले. त्याचवेळी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोधा यांचे नाव या प्रकरणात सुचवले. याला प्रतिवाद करताना सरन्यायाधीश म्हणाले की, या देशात जो निवृत्त झाला आहे किंवा निवृत्त होत आहे त्याला कोणतीही किंमत या देशात नाही.

शिक्षण व्यवस्थेवर थेट भाष्य

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी तीन दिवसांपूर्वीच देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर थेट भाष्य केले होते. आचार्य नागार्जुन विद्यापीठातून (ANU) डॉक्टर ऑफ लेटर्सची मानद पदवी मिळाल्यानंतर दीक्षांत समारंभात बोलताना रमण्णा म्हणाले की, देशात शिक्षण संस्थांचे कारखाने झपाट्याने वाढत आहेत. विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील आव्हानांचा सामना करायला हवा. तसेच उच्च शिक्षण संस्था सामाजिक सुसंगतता गमावत असल्याबद्दल रमण यांनी खेद व्यक्त केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here