नाशिक,दि.७: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदावरून वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदावरून वारंवार चर्चा होत राहते. स्वतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. ते शनिवारी (७ ऑक्टोबर) नाशिकमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “एक एक आमदार तीन तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. म्हणजे ५०-५५ आमदार असतील तर दीड दोन कोटी लोकांचे प्रतिनिधी येथे आले आहेत. एवढं पाठबळ असलेले आमदार, खासदार अजित पवारांबरोबर असतील, तर न्यायाचा तराजू अजित पवार यांच्या बाजूनेच झुकणार याविषयी माझ्या मनात शंका नाही.”
तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील त्यासाठी सर्वांना…
“सगळे म्हणतात की, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मात्र, ते मुख्यमंत्री कसे होणार. त्यासाठी स्टेजवर असलेल्या सर्व लोकांना काम करावं लागेल. आजचा ४५ चा आकडा ९० आमदारांपर्यंत नेऊन ठेवला पाहिजे. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील. त्यासाठी सर्वांना झटावं लागेल, काम करावं लागेल,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून…
“जिथे जिथे निवडणूक होईल तेथे अजित पवारांचे लोक निवडून आले पाहिजेत. ही शक्ती आपण त्यांच्या पाठीमागे उभी करू शकलो नाही, तर केवळ अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून ते होणार नाही. त्याची जबाबदारी सर्वांना उचलावी लागेल,” असंही भुजबळांनी नमूद केलं.