सांगोला,दि.१३: मयत व्यक्तीच्या नावाने तोतया इसम उभा करून बनावट दस्त करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मौजे एखतपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील जमीन गट नं. ३५३ मधील मुळ मालक मयत बाबुराव भोजू भोसले हे सन २००० साली मयत झालेले आहेत. त्यांच्या नावे तोतया इसमास उभे करुन सदरचा बनावट खरेदीदस्त, बनावट आधारकार्ड तयार करुन दुय्यम निबंधक कार्यालयात दिनांक ५ जुलै २०२३ रोजी नोंदणी केलेला असल्याने त्याबाबत शिवाजी भिमराव चव्हाण (दुय्यम निबंधक श्रेणी. १ सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे सांगोला पोलीस ठाणेस गु. र.नं. ११६२/२०२३ भा. द. वि. सं.क. ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ नोंदणी अधिनियम कलम ८२ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.
सदर गुन्हयाचा सांगोला पोलीस तपास करत असताना लिहून घेणार समाधान सुखदेव माने रा. शेटफळ, ता. पंढरपूर व साक्षीदार रामेश्वर सयाप्पा माने रा. शेटफळ, ता. पंढरपूर, समाधान तुकाराम दुधाळ रा. सावे, ता. सांगोला, जि. सोलापूर हे प्रथमदर्शनी आरोपी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
त्यांचेकडे सखोल तपास केला, असता सदरचा बनावट दस्त हा समाधान सुखदेव माने ,रामेश्वर सयाप्पा माने (रा. शेटफळ, ता. पंढरपूर), समाधान तुकाराम दुधाळ (रा. सावे, ता. सांगोला), तोतया इसम बंडू संभाजी पवार (रा. वाटंबरे, ता. सांगोला), किसन खंडागळे (रा. चिंचोली रोड, सांगोला), शहाजी विठठल भोसले (रा. महुद रोड, सांगोला), बाळासाहेब शिवलिंग घोंगडे (रा. विद्यानगर, सांगोला), यासीन अल्लाउद्दीन इनामदार (रा. चिंचोली रोड, सांगोला) या टोळीने संगणमत करून बनावट आधारकार्ड बनवून मयताचे ठिकाणी तोतया इसम बंडू संभाजी पवार यास उभे करुन बनावट दस्त केलेला आढळून आले आहे.
यातील चार आरोपींना सध्या सांगोला पोलिसांनी अटक केलेली असून इतर आरोपी फरार आहेत. त्यांना लवकरच शोधून अटक करण्यात येईल तसेच अजूनही सदर गुन्हयात आरोपी वाढण्याची शक्यता आहे, असे पो. नि. अनंत कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विक्रांत गायकवाड, पो. नि. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. हेमंतकुमार काटकर, पो.ना. बाबासाहेब पाटील, पो.कॉ. लक्ष्मण वाघमोडे, वसीम शेख यांनी केली तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.हे.कॉ. युसूफ पठाण यांनी मदत केली आहे.








