Home क्राइम वादग्रस्त वक्तव्याचा झटका, भाजप नेत्याला अटकेचा धक्का

वादग्रस्त वक्तव्याचा झटका, भाजप नेत्याला अटकेचा धक्का

0
विजय चौधरी

नंदूरबार,दि.७: विवादित ऑडिओ क्लिप्समुळे राजकीय वर्तुळात गदारोळ उठवणारे भाजप नेते विजय चौधरी (Vijay Choudhari) पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी रात्री ही कारवाई केली असून, त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर हे कठोर कायदेशीर पाऊल उचलण्यात आले.

विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील सुमारे तीन हजार कॉल रेकॉर्डिंग्ज बाहेर आल्याने नंदुरबारसह संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिना गावित यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचसोबत शिवसेना (शिंदे गट) आमदार आमशा पाडवी यांनीही अक्कलकुवा येथे स्वतंत्र तक्रार नोंदवली होती. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी चौधरींना ताब्यात घेतले असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्राचे संयोजक राहिलेले विजय चौधरी हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, एकामागून एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप्स समोर आल्यानंतर वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चौधरी यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर आंदोलने आणि मोर्चेही काढण्यात आले होते.

या व्हायरल क्लिप्समध्ये डॉ. हिना गावित यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबतही अनुचित विधाने असल्याचे समोर आले आहे. तसेच, राज्यमंत्री गिरीश महाजन, भागवत कराड आणि जयकुमार रावल यांसारख्या बड्या नेत्यांसोबतच्या संभाषणांचे अंशही यात ऐकायला मिळतात. चौधरी यांच्या माजी वैयक्तिक सहाय्यकाने (PA) वैमनस्यातून हे सर्व कॉल रेकॉर्ड सार्वजनिक केल्याचा आरोप आहे. पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांविषयीची ही कथित संभाषणे बाहेर आल्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.