नवी दिल्ली,दि.4: भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मिशन 400 पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजप तळागाळात तयारी करत आहे. भाजपकडून रणनिती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम महिलांना प्रशिक्षण देत आहे. विशेषत: त्यांना निवडणूक कर्तव्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
यावेळी मतदानाच्या दिवशी भाजप मुस्लिमबहुल भागातील बुथवर बुरखाधारी महिला तैनात करणार आहे. या बुरखाधारी महिला भाजपच्या पोलिंग एजंट म्हणून काम करतील. मतदानादरम्यान होणाऱी फसवणूक रोखण्याचं काम या महिला करतील. मतदानाच्या दिवशी मुस्लिमबहुल भागात महिला बुरखा घालून मतदानासाठी येतात आणि अशा परिस्थितीत बुरख्याच्या आडून बनावट मतदान होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे बनावट मतदान रोखण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाने यावेळी एक अनोखा प्रयोग केल्याचे निश्चितच म्हणता येईल आणि हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिले जात आहे.
यासाठी 10-10 महिलांचा ग्रुप बनवला जात असून त्यांना पोलिंग एजंटचं प्रशिक्षण दिलं जात आहे. पोलिंग बूथवर बनावट मतदार ओळखायचे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने बनावट मतदान रोखण्याचं या ब्रिगेडचं काम असणार आहे.
मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर खूश असलेला मुस्लिमांचा मोठा वर्ग त्यांच्यात सामील होऊ शकतो, असा भाजपला विश्वास आहे. विशेषत: मुस्लिम महिला, कारण मोदी सरकारने कायदा करून तिहेरी तलाकची वाईट प्रथा बंद केली. महिला हज यात्रेला एकट्या जाऊ शकतात. सरकारने हज यात्रेतील व्हीआयपी कोटा रद्द केला. हज कोटा 1.75 लाखांवरून 2 लाखांपर्यंत वाढला आहे. २ कोटींहून अधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. याच कामातून मुस्लिम महिलांचा एक वर्ग मोदी सरकारचा चाहता बनला.