मुंबई,दि.१: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या आत्मचरित्रात मोठा दावा करण्यात आला आहे. भाजप आणि शिवसेनेत २०१९ साली वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात महाविकास आघाडी स्थापनेबाबत लिहिताना केला आहे. भाजपला वर्चस्वासाठी राज्यातून शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते, असेही त्यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. २ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
हेही वाचा Maharashtra Rain Alert: पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा
शरद पवारांच्या आत्मचरित्रात मोठा दावा
विधानसभा निवडणुकीत शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा असे जागा वाटप ठरलेले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने १२४ आणि भाजपने १६४ जागा लढविल्या. स्वत:च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे, असा चंग भाजपने बांधला होता. ५० मतदारसंघांत शिवसेना उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर होते. त्यातील बहुतेक भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने उभे होते, असा दावाही पुस्तकात आहे. २०१५ नंतरच्या राजकीय परिस्थितीवर पवारांनी भाष्य केले आहे.
भाजपाला राज्यातून शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करत येणार नाही, असा सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.