एटीएम मशीन जीपला बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न

0

टेंभुर्णी,दि.१८: शहरातील एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) एटीएम मशीन वायरने स्कार्पिओ जीपला बांधून ओढत घेऊन जाण्याचा सहा सात चोरट्यांचा डाव वॉचमनने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे व वायर तुटल्याने फसला असून बँकेची लाखो रुपयांची रक्कमही वाचली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वादोन वाजता हांडे कॉम्प्लेक्स येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरात करमाळा रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्या शाखेत एटीएम मशीन असून या ठिकाणी पंचरत्न लोंढे ( वय २१, रा. माळेगाव, ता. माढा ) हा वॉचमन रात्रपाळीत ड्यूटीवर होता.

तो रात्री नैसर्गिक विधीस गेल्यानंतर सव्वादोन वाजता करमाळा चौकातून एक पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ जीप आली. त्यातून एक अनोळखी इसम उतरला. त्यावेळी वॉचमन लोंढे यास ते रक्कम एटीएममधून काढण्यासाठी आले असावेत असे वाटले. पण काही क्षणात त्याने एटीएम मशीन बांधून ओढण्याचा प्रयत्न सुरू केला.

यामुळे लोंढे हा धावतच आला व त्याने गाडीवर दगड मारुन आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. जीपला त्याने दगड मारणे सुरूच ठेवले असतानाही जीपचालकाने एटीएम मशीन दीडशे फूट तसेच ओढत नेले. तेथे वायर तुटली. त्यावेळी शेजारील लोक जागे झाले अन् चोरटे जीपमधून पळून गेले. त्यातील रक्कम वाचली. जीपचा नंबर समजू शकला नाही.

पोलिसांना याची खबर मिळताच, काही वेळेत पोलिसांची गस्तीची जीपही तेथे आली. त्यानंतर शाखाधिकारी सोमनाथ उंबरे यांना कळवताच तेही तेथे हजर झाले. उंबरे यांनी एटीएम मशीनचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कर्मचारी भीमराव गोळेकर हे करीत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here