मुंबई,दि.१०: आमदार अपात्र प्रकरण कायदेतज्ज्ञांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप केला आहे. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे. ५६ दिवस ५६ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करू शकतात. पण, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत, असं असीम सरोदे यांनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
असीम सरोदे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणी १४१ पानांचा निकाल दिला होता. त्यात परिच्छेद ११० आणि १११ मध्ये रिझनेबल टाईममध्ये (ठराविक वेळेत) याप्रकरणाचा निर्णय घ्यावा, असं म्हटलं आहे. पण, रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असं सांगितलं नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. ही संवैधानिक अनैतिकता आहे.”
…३ महिन्यांत निकाल दिला पाहिजे
“मणिपूरमधील के. मेघचंद्र विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केलं की, सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांत निकाल दिला पाहिजे. गुंतागुंतीची परिस्थिती असेल, तर ३ महिने आणि सामान्य परिस्थिती असेल, तर ३ महिन्यांमध्ये निकाल लागला पाहिजे. मात्र, १६ आमदारांच्या संदर्भात कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही,” असं असीम सरोदे यांनी सांगितलं.
“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर कार्यवाही करण्याचं काम राहुल नार्वेकरांना करायचं होतं. पण, कोणतेही काम राहुल नार्वेकरांनी केलेलं नाही. नार्वेकरांनी वेळकाढूपणासाठी शिवसेनेची मूळ घटना अभ्यास करायची आहे, असं सांगून निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी केली. घटनेचा अभ्यास करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा काही संबंधच नाही,” असं असीम सरोदेंनी स्पष्ट केलं.
सुनील प्रभूंच्या व्हीपवर नार्वेकरांनी काय
“भरत गोगावले यांची प्रतोदपदी आणि एकनाथ शिंदे यांची राहुल नार्वेकरांनी गटनेतेपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने सांगितलं. सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद आहेत. त्यांनी काढलेल्या व्हीपवर राहुल नार्वेकरांनी काय कार्यवाही केली? व्हीपच्या विरुद्ध कार्यवाही करणारे सर्वजण अपात्र आहेत. याचा अर्थ १६ आमदार अपात्र आहेत. त्यानंतर बाकीचे गेलेले आमदारही पक्षविरोधी कारवाई केल्याने अपात्र ठरतात,” असं असीम सरोदे म्हणाले.
“वेळकाढूपणासाठी १६ आमदारांचे १६ वकील आणले जातील. मग, उद्धव ठाकरे गटाचं मत ऐकून घेतलं जाईल,” असं सरोदेंनी सांगितलं.