मुंबई,दि.११: Asim Sarode On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी मोठं विधान केलं आहे. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाचे पाचसदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काल सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. उद्याचा दिवस भरगच्च कामकाजाचा असेल, असे समलैंगिक विवाह प्रकरणावरील बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना सांगितले. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेला, तसेच सर्व न्यायाधीशांची सहमती लाभलेला ५-०, असा सर्वसंमतीचा असेल, असे संकेत मिळाले आहेत. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले असीम सरोदे? | Asim Sarode On Maharashtra Political Crisis
सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना मान्यता दिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि राजकीय पडझड पाहायला मिळेल, असं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरले तर शिंदे गटातील इतर २४ आमदारही अपात्र ठरतील, असंही असीम सरोदेंनी नमूद केलं. ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते.
हेही वाचा कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं महत्त्वाचं विधान, ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कृती…’
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर भाष्य करताना असीम सरोदे म्हणाले, “उद्या महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या पक्षांत्तराच्या संदर्भातील प्रवृत्तीवर आणि पक्षांत्तर बंदी कायद्याच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. याचे दूरगामी परिणाम भारताच्या राजकारणावर होतील. गेल्या काही काळात एका पक्षातून निवडून येणं आणि दुसऱ्या पक्षात जाणं, पक्षांत्तर करणं, पक्ष फोडणं, या सगळ्याच गोष्टी सातत्याने वाढत गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या वाईट प्रवृत्तीचा कडेलोट होईल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने गंभीरपणे घेतली तर संपूर्ण निकाल न्यायालयच देईल. कोण पात्र आहे? कोण अपात्र आहे? कुणाची चूक आहे? कुणी घटनाबाह्य काम केलं? या सगळ्याची नोंद या निकालामध्ये असेल.”
सुनील प्रभूंना ‘प्रतोद’ म्हणून मान्यता मिळाली तर
शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले, तर सरकारवर काय परिणाम होईल? असं विचारलं असता असीम सरोदेंनी सांगितलं, “केवळ १६ नव्हे तर इतर २४ आमदारांसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे १६ आमदार अपात्र ठरले तर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले इतरही आमदार अपात्र ठरू शकतात. शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी सुनील प्रभू यांना ‘प्रतोद’ म्हणून नेमलं होतं. त्यांनी काही व्हीप जारी केले होते. त्या व्हीपचा अनादर करणारे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात कुणाला ‘प्रतोद’ म्हणून मान्यता मिळते? हे पाहणं गरजेचं आहे. सुनील प्रभूंना ‘प्रतोद’ म्हणून मान्यता मिळाली, तर महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय बदल पाहायला मिळेल. त्याचबरोबर मोठ्या राजकीय घडामोडी आणि पडझड पाहायला मिळेल. न्यायालयाने सुनील प्रभूंना ‘प्रतोद’ म्हणून मान्यता दिली, तर अपात्रतेच्या रेषेवर उभे असणारे सर्व आमदार अपात्र ठरवले जातील.”