मुंबई,दि.६: Anil Parab On Shinde Group: ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल परब यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन आपल्यासोबत अनेक आमदार गुवाहटीला नेले. गुजरात व्हाया आसाम आणि गोवा असा प्रवास पूर्ण करुन ते महाराष्ट्रात थेट आले अन् राज्याचे मुख्यमंत्रीच बनले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी सत्य घटना महाराष्ट्रासह देशाने गतवर्षी पाहिली. तेव्हापासून शिवसेनेत दोन गट पडले असून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगला आहे. ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब हे सातत्याने माध्यमांसमोर येऊन बाजू मांडतात. यावेळी, शिंदे गटावरही प्रहार करतात. आता, आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा या कार्यक्रमातून अनिल परब यांनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केलाय.
शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे अनिल परब हे आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, परबांनी हे आरोप फेटाळले असून जाणीवपूर्वक भाजपकडून त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. तर, शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादात ठाकरे गटाची कायदेशीर बाजू सांभाळण्याचं काम अनिल परब करत आहेत, ते स्वत: वकील आहेत. त्यामुळेच, ते कायदेशीर लढाईसाठी शिवसेनेकडून पुढे आहेत.
अनिल परब यांची जोरदार टीका | Anil Parab On Shinde Group
नुकतेच शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्या व्हिडिओतून अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला. बाळासाहेबांचा विचार आणि वारसा घेऊन जाणार म्हणत काही लोकं गुवाहटीला गेले. पण, गुवाहटीला गेलेल्या ४० आमदारांपैकी २५ जणांनी नावे मी सांगू शकतो, ज्यांचा बाळासाहेबांसोबत कधीच संबंध आला नाही. अशी लोकं बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय, असं सांगत आमच्यापासून दूर गेल्याचं परब यांनी म्हटलं.
शिंदे गटाच्या सगळ्या शेंड्या या भारतीय जनता पक्षाच्या हातात दिल्या आहेत. ते उठ म्हटलं की उठायचं अन् ते बस म्हटलं की बसायंच, अशी अवस्था शिंदे गटाची आहे, असे म्हणत अनिल परब यांनी शिंदे गटाची अवस्था सांगितली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, शिंदे गटाच्या १६ आमदारांना आणि उर्वरीत २३ आमदारांना अपात्र करण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असेही परब यांनी म्हटलं आहे. या पॉडकास्टचा शॉर्ट व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. त्यात, त्यांनी भाजप-शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.