धुळे,दि.१५: मराठा आरक्षण प्रश्नावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने एका महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे राज्यभर मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसले होते.
त्यांच्याबरोबर शेकडो मराठा आंदोलकही उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्यांवर १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. गृहमंत्रालयानेच पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेत्यांनी केला होता. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, “विधीज्ञ उके यांनी त्यांच्या पुस्तकात मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर एक मोठा लेख लिहिला होता. या लेखात स्पष्टपणे म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयात लागणारे वकील आणि सर्व खर्च हा देवेद्र फडणवीस ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेच्या वतीने करण्यात आला.” सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत अनिल गोटे बोलत होते.
माजी भाजपा आमदार अनिल गोटे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी चुकीचं केलं असं मी म्हणणार नाही. कारण, महाराष्ट्रात जातीवर नव्हे तर गुणावर आरक्षण मिळालं पाहिजे ही बाब मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवली जाते.
दरम्यान, अनिल गोटे यांच्या आरोपाला, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुषार भोसले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्तकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे. परंतु, तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील.