Amravati Flood: पावसामुळे मोठं नुकसान, पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं, तिघांचा मृत्यू

0

अमरावती,दि.23: Amravati Flood: पावसामुळे मोठं नुकसान झाले आहे. पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं आहे. राज्याच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात तर पावसानं कहर केला आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात मोठं नुकसान | Amravati Flood

अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला असून, पुराचं पाणी गावात शिरलं आहे. जिल्ह्यात 435 घरांची पडझड झाली असून, अनेक गावातील रस्ते वाहून गेले आहेत. तब्बल 16 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत. उभं पीक पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हातबल झाला आहे. दुसरीकडे अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा वाढल्यानं 13 पैकी नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पुढील दहा दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट

दरम्यान दुसरीकडे आज राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here