मुंबई,दि.5: अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आणखी एक आमदार शरद पवारांसोबत गेला आहे. अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहातात यावरून संख्यांबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांना मोठा धक्का
मात्र या बैठकीपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. बैठकीपूर्वीच आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादीचे नाशिक देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर हे पुन्हा शरद पवारांसोबत आले आहेत. यापूर्वी जे आमदार अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते, त्यातील काही आमदार हे दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या गाडीत दिसून आले होते.
आज संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार
आज मुंबईमध्ये दोन्ही गटाकडून बैठका बोलावण्यात आल्या आहेत. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून आज संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. या बैठकीनंतरच दोन्ही गटाची रणनिती ठरणार असल्यानं या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर 6 जुलैला म्हणजे उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे स्वत: असणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या आधारे पक्षाचा प्रभारी कोण असेल याचा निर्णय होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन कायदेशीररीत्या आपली बाजू भक्कम करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.