मुंबई,दि.5: राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून आज संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा समोर आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार यांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
अजित पवारांसोबत 44 आमदार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. 44 आमदारांमध्ये विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. या 44 आमदारांनी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र दिलं आहे. शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. मात्र जरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून असा दावा करण्यात आला असला तरी बहुमताचं चित्र हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. या बैठकीनंतरच दोन्ही गट आपली पुढील रणनिती ठरवण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर 6 जुलैला म्हणजे उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे स्वत: असणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या आधारे पक्षाचा प्रभारी कोण असेल याचा निर्णय होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन कायदेशीररीत्या आपली बाजू भक्कम करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.