मुंबई,दि.१०: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २४व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले.
अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.
“आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन”, असेही त्यांनी म्हटले.